स्वाधिष्ठान चक्र

मुख्यपृष्ठ | स्वाधिष्ठान चक्र

देवता: ब्रह्मदेव, शक्ती सरस्वती
स्थूल स्वरूप: आर्टिक प्लेक्सस
कार्य: यकृत, मूत्रपिंड , प्लिहा व स्वादुपिंड यांच्या कार्यांचे नियंत्रण
पाकळ्यांची संख्या: सहा
संबंधित दिवस: बुधवार
संबंधित रंग: पिवळा
संबंधित ग्रह :बुध
संबंधित तत्त्व: अग्नी
संबंधित खडा: अमेथिस्ट
हातावरील स्थान: अंगठा
दोषांची कारणे
डावी बाजू: प्रेत विद्या, काळी जादू, अगुरू, मद्यपान , अमली पदार्थांचे सेवन, मानसिक गुलामी
उजवी बाजू: अतिशय विचार करणे, नियोजन करणे, कर्मकांडांचा अतिरेक, चुकीच्या खाण्याच्या सवयी, अहंकारी, दुसर्यावर प्रभुत्व गाजवण्याचा स्वभाव

प्रास्ताविक

पुराणात आपण वाचले आहे की श्रीविष्णूच्या नाभीमधून एक कमळ वर आले, ज्यावर श्री ब्रह्मदेव विराजमान होते म्हणून श्री विष्णूंना पद्मनाभ हे एक नाव आहे. स्वाधिष्ठान चक्र नाभी चक्रातून येऊन कमळाच्या लांब देठाप्रमाणे त्याच्याशी संलग्न असते व भवसागरात (void) आवश्यकतेप्रमाणे फिरत असते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर प्रथम नाभी चक्रात येऊन तेथून ती स्वाधिष्ठान चक्रात जाते . त्याला प्रकाशित करून पुन्हा नाभी चक्रात येते आणि वरच्या चक्रांकडे जाते.

गुण

सृजनशीलता स्वाधिष्ठान चक्राचा मूलभूत गुण आहे. या ठिकाणी सृजनाला आवश्यक ती शक्ती तयार होते. आत्मसाक्षात्कारानंतर आपल्या लक्षात येते की, सामूहिक चेतना हा सृजनशीलतेचा उगम आहे.या सृजनशीलतेच्या अभिव्यक्ती चे आपण माध्यम होऊ शकतो. सृजनशीलतेचे कार्य, मग त्याचे कोणतेही स्वरूप असो, स्वाधिष्ठान चक्राच्या गुणांच्या उपयोगाने होते, पण तेच कार्य, सूक्ष्म यंत्रणेतील सुषुम्ना नाडीच्या शक्तीतून झाल्यास ते संतुलनातून होते आणि आपल्याला म्हणता येईल की ते हृदयातून झाले. आत्म्याच्या प्रेरणेतून ती निर्मिती असते.

देवता

स्वाधिष्ठान चक्राची अधिष्ठात्री देवता श्री ब्रह्मदेव आहेत ( विश्वनिर्मिती). त्यांची शक्ती सरस्वतीमाता संगीत व कलांची देवता आहे.

स्थूल शारीरिक कार्य

या चक्राचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य म्हणजे ते आपल्याला विचार करायला शक्ती देते. अतिशय विचार व नियोजन यांच्यामुळे हे चक्र अशक्त होते. या चक्रातील दोष ,हाताचा अंगठा व मधले बोट यांच्यावर झिंझिण्या, सर्व हातावर टोचल्यासारखे जाणवणे इत्यादी संवेदनांमुळे लक्षात येतात.
यकृताचे विशेष महत्त्व आहे, कारण ते आपल्या चित्ताचे स्थान आहे. चित्त म्हणजे शुद्ध साक्षी स्वरूपत्व आहे. संतुलित यकृतामुळे चित्ताची शुद्धता, संगोपन व पोषण होते. शुद्ध चित्तामुळे ध्यानात मनःशांती व स्थैर्य मिळते. यकृतातील अतिरिक्त उष्णतेचा चित्तावर परिणाम होऊन ज्ञान व्यवस्थित होत नाही.

स्वाधिष्ठान चक्राची स्वच्छता

  • अशक्त स्वाधिष्ठान चक्रामुळे ध्यानात अडथळे, स्वभावात चिडचिडेपणा अशा स्वरूपाचे त्रास होऊ शकतात. गूढ विद्येत रुची घेतल्यास या चक्राचे नुकसान होऊ शकते.

उजव्या स्वाधिष्ठान चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

  • मीठ घातलेल्या पाण्यात (किंवा बर्फासारखे थंड पाणी) पाय ठेवून ध्यान करणे
  • खालच्या पोटाच्या उजव्या बाजूवर आईस पॅक ने शेकणे.
  • डावा हात उजव्या स्वाधिष्ठानावर ठेवून ध्यान करावे.

प्रार्थना

  • श्री माताजी कृपा करून माझे विचार थांबवा.

सामान्य सूचना

उजवा हात श्री माताजींच्या फोटोच्या बाजूस करून डावा हात खालच्या पोटाच्या उजव्या बाजू वर ठेवावा व प्रार्थना करावी. तसेच उजवा हात श्री माताजींच्या फोटोचे बाजूस करून डावा हात कोपरात दुमडून उभा करून प्रार्थना करावी.

डाव्या स्वाधिष्ठान चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

  • मीठ घातलेल्या गरम पाण्यात पाय ठेवून ध्यान करणे.
  • मेणबत्तीची ज्योत खालच्या पोटाच्या डाव्या बाजूस समोर योग्य अंतरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वर्तुळाकार फिरवावी.

प्रार्थना

  • श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या. (सहा वेळा म्हणावे)

सामान्य सूचना

  • डावा हात फोटोचे बाजूस ठेवून उजवा हात डाव्या स्वाधिष्ठान चक्रावर ठेवून ध्यान करावे.
  • डावा हात फोटोचे बाजूस करून उजव्या हाताचा तळवा जमिनीवर पालथा ठेवून ध्यान करावे.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058