सहजयोग परिचय

मुख्यपृष्ठ | सहजयोग परिचय

आत्मा, परमेश्वर व त्यांची शक्ती यांचे विषयी आपल्याला नेहमीच कुतूहल वाटते. त्यांना जाणण्याचे आपण विविध मार्गाने प्रयत्न करतो. सर्व धर्मातील संतांनी व प्रेषितांनी आत्मसाक्षात्काराचे महत्त्व वर्णिलेले आहे. त्यांच्या वाङ्मयाचे वाचन पिढ्यानपिढ्या होत आले आहे. परंतु जनसामान्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला नाही. त्यामुळे सहाजिकच अनेक प्रणाली, रूढी व परंपरा प्रस्थापित झाल्या. आत्मसाक्षात्काराशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. जोपर्यंत आपणास आपल्या आत्म्याची ओळख पटत नाही, मी कोण आहे याचा उलगडा होत नाही, तोपर्यंत आपणास परम सत्य काय आहे याची जाणीव होणार नाही. आत्म्याच्या प्रकाशाशिवाय ज्या-ज्या गोष्टी आपण धर्माच्या नावावर करतो त्या सर्व अंधश्रद्धेतून केल्या जातात.

सहजयोग म्हणजे काय तर सहज याचा अर्थ आहे आपल्याबरोबर जन्मलेला, स्वाभाविक विनासायास घटित होणारा आणि योग म्हणजे परमेश्वरी शक्तीशी संलग्नता. प्रत्येक माणसाच्या शरीरात जन्मतःच एक सूक्ष्म यंत्रणा असते, ती नसांची यंत्रणा असून तिच्या जागृतीने सहजयोगाचा लाभ होतो. म्हणजेच ईश्वरी शक्तीशी विनासायास संलग्नता मिळते. या अनुभवास आत्मसाक्षात्कार असे म्हणतात. सर्व धर्मांच्या शिकवणुकीत त्याचे महत्त्व वर्णिलेले आहे. सहजयोगाचे वेगळेपण असे की यात मिळणारा आत्मसाक्षात्कार, हा आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ आहे. याच्यासाठी आपल्यातील सूक्ष्म कुंडलिनी शक्तीच्या जागृतीसाठी आपल्याला सत्य जाणून घेण्याची हृदयापासून इच्छा असावी लागते. जागृती झाल्यावर, कुंडलिनी शक्ती सुषुम्ना मार्गातून उत्थापित होते आणि षट चक्रांचे म्हणजे सूक्ष्म शक्ती केंद्रांचे भेदन करून त्यांचे पोषण व प्रकाशन करते. या शक्तीने कपाळाच्या मागे असलेले आज्ञा चक्र छेदल्यावर, साधकाला जाणिवेच्या निर्विचार स्थितीचा अनुभव येतो. ही खरी ध्यानाची पहिली अवस्था होय. प्रत्येक दिवशी काही क्षण जरी आपल्याला ही अवस्था प्राप्त झाली तरी त्याच्यामुळे आपल्या जीवनात शारीरिक, बौद्धिक, भावनिक व आध्यात्मिक परिवर्तन होऊ शकेल.

परमेश्वरी प्रेमाची शक्ती ही सर्वव्यापी असून प्रत्येक माणसात ती कुंडलिनी शक्तीचे रूपाने प्रतिबिंबित झालेली असते. अनेक धार्मिक ग्रंथांच्यामध्ये या शक्तीचे वर्णन केलेले आहे. माणसात निद्रिस्त असलेल्या या शक्तीची जागृती झाल्यास अनेक साधुसंतांनी वर्णिलेल्या आत्मसाक्षात्काराची आल्हाददायक अनुभूती मिळते. सर्वव्यापी परमचैतन्याशी योग घटित होतो. सहजयोगात, परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांच्या कृपाशीर्वादाने हे सर्व विनासायास घडून येते.

मस्तकाच्या टाळूच्या भागातील हजार पाकळ्यांच्या सहस्त्रार चक्राचे भेदन झाल्यावर शक्ती परम चैतन्याशी अर्थात परमेश्वराच्या सर्वव्यापी प्रेम शक्तीशी संलग्न होते. त्या संवेदना आपल्याला जाणवतात. मन, भावना आणि अहंकार यांच्याशी असलेली तन्मयता जाऊन खऱ्या स्वरूपाची आत्मतत्त्वाची आपल्याला अनुभूती मिळते. ही आत्मसाक्षात्काराची अवस्था आपल्याला आंतरिक सौंदर्याचा व मुक्ततेचा अनुभव देते. श्रीमाताजी म्हणतात, “तुम्हाला निर्माण करणाऱ्या शक्तीशी जोडले जाईपर्यंत तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ समजणार नाही”.

सहजयोगाचे फायदे

 • मनःशांती, आत्मविश्वास, समाधान व आनंद यांची वृद्धी.
 • सुदृढ शरीर व मन तसेच मानसिक तणाव कमी होतो.
 • व्यसने व इतर अयोग्य सवयी यातून मुक्तता.
 • व्यक्तिगत नातेसंबंधात सुधारणा.
 • सुप्त कलागुणांचा विकास.
 • चित्ताची एकाग्रता आणि स्मृती व आकलन शक्ती यांच्यात सुधारणा.
 • आपल्या हातावरच्या ईश्वरी चैतन्याच्या लहरींमुळे, आपण स्वतःलाच मार्गदर्शन करू शकतो.
 • कृषी क्षेत्रात चैतन्य लहरीद्वारे प्रगती.
 • सहजयोगाची साधना संसारी लोकांना त्यांचे उद्योग व्यवसाय सांभाळून सहकुटुंब करता येते. त्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही. सहजयोग साधनेसाठी कशाचा त्याग करावा लागत नाही.
 • तसेच सर्व धर्म, जाती व पंथाच्या लोकांना त्याचा लाभ होतो.
 • सहजयोगाची सर्व माहिती, अनुभूती व मार्गदर्शन हे विनामूल्य दिले जाते.

Our Gallery

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058